बीडचा गर्दीतला कोरोना प्रवास

बीड शहर दहा दिवस बंद राहणार असल्याने मित्र योगेश नरवडे यांच्यासोबत मी आज कृषी दुकानाचा माल खरेदी करण्यासाठी शहराकडे निघालो होतो. शहराच्या जवळ आलोच ह़ोतो की पावसाने चाल केली. तांड्यावर चिलट्या (भुरभुर) पाऊस सुरू झाल्याने गाडी मागे वळुन निवारा शोधण्याचा अंदाज लागताच मी पुढे उड्डाण पुलाखाली थांबता येईल म्हणुन गाडी तशीच दामटायला लावली. शे-दोनशे मिटर पुढे आलो की लगेच पाऊस बंद झाला. कदाचित त्याला शहरात जाणाऱ्या माणसांना भीजवण्यात आनंद वाटत असावा. तसेही आजकाल मुद्दामहून कोणी पावसात मनसोक्त भिजताना दिसत नाही. म्हणुन हा निसर्गाचा प्रयत्न असावा. असो.

शहरात प्रवेश करताच मोंढ्याकडे जाणाऱ्या खोदुन ठेवलेल्या रस्त्यातील छोट्या-छोट्या स्विमींग पुलातून रस्ता शोधत आणि आपल्याच देशातील मातीचा सुगंधित चिखल श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर राधा-कृष्णाने रंगपंचमी खेळावी तशी पण एकमेकांच्या अंगावर जाऊन नस्ती भांडणं होणार नाही अशा रीतीने उडवत निघालो होतो. पुढे वाहनं ऊभी दिसताच शहर बंद राहणार म्हणुन आज गर्दी थोडी जास्तच असावी असे मनातल्या मनात ठरवत मुंगीच्या पावलांनी पुढे सरकलो तर एक महापुरुष भर रस्त्यावर बंद पडलेल्या बारक्या हत्तीला (TATA ACE) पंप मारताना दिसले. अर्थात त्या गर्दीत हे महापुरुष आपले योगदान देत होते हे वेगळे सांगायला नको. 

पुढे मोंढा रोडणे जिजामाता चौकाकडे निघालो असता एक बाजुच्या रस्ता खोदून दगडी खरप (खरप दगडाचाच असतो पण समजायला सोपे जावे म्हणून "दगडी") भिजु घातला असल्याने  तो बंद होता व गर्दी कोंडली गेली होती. त्यात दुचाकी वाले चार-पाच नमुने चुकीच्या मार्गाने शिरल्याने एका सज्जन मानवाला वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्याचे कर्तव्य बजावताना पाहुन बीडकर असल्याचा अभिमान वाटला. त्या सज्जनाचा सत्कार करावा असे मनोमन वाटले पण त्यांची गाडी जाण्यास मार्ग मोकळा होताच ते अदृष्य झाल्याने व वेळेची कमतरता आणि गर्दी अभावी तुर्तास सदरील कार्यक्रम टाळावा लागला.

जिजामाता चौकातुन डी.पी. रोडने *** बॅंकेकडे निघालो असता गाड्यांना गाड्या आणि माणसांना माणसं चिटकलेली पाहुन शहरवासियांच्या सतर्कतेचा व शहरातील कोरोना रूग्ण का कमी होत नाहीत याचा अंदाज लागला. तोपर्यंत बॅंकेत पोहोचलो होतो चार वाजण्यास अवकाश होता पण कर्मचारी मात्र सर्वकाही आवरून निवांत बसलेले दिसले, विचारपुस केली असता आज जरा लवकरच बंद केल्याचे समजले. दहा दिवसांच्या सुट्टीने सर्वजण अंतर्बाह्य सुखावल्याचे स्पष्ट दिसत होते पण आमचे काम वेळेत पोहचुनही न झाल्याने निराशा पदरी घेऊन आम्ही माघारी फिरलो. खाली उतरून रस्त्यावर आल्यावर आणखी एका महाशयाने भर रस्त्यावर त्याची चारचाकी गाडी उभी करून गर्दी वाढवण्यात हातभार लावला होता त्यातच तीन मुली रस्त्याच्या बाजुला स्कुटी पार्क करत अनेकांचे लक्ष वेधुन घेताना दिसल्या. अर्थात त्यात काही विशेष नव्हतेच म्हणा, पण त्यातील एका मुलीच्या अंगभर पण थोड्या विचीत्र ड्रेसने बऱ्याच जणांना विचारात टाकले होते. एखाद्या शालीला (शुध्द शब्द शॉल) मधोमध मुंडक जाण्याएवढं  छिद्र पाडले की तीच्या सारखा ड्रेस तयार झालाच समजा असा तिचा पेहराव होता. एवढ्या गर्दीत सुध्दा बीडकर कमालीचे दक्ष असल्याचे पाहून मी मात्र कृतकृत्य झालो.

आता आम्ही मोंढ्यात पोहोचलो आणि खरी गर्दी इथे पहायला मिळाली. चुकीच्या मार्गाने शिरणारे दुचाकीस्वार, कर्णकर्कश हारना (हॉर्न) वाजवुन सर्वांना अलर्ट करणारे टेम्पोवाले त्यात कमरेला वायरलेस व शिट्टी अडकुन हाताच्या इशाऱ्याने ट्रॅफिक मोकळी करणारे (कारण त्या गोंगाटात त्याच्या शिट्टीने कधीच दम तोडला असता) पोलिस दादा अशा या भारून टाकणाऱ्या वातावरणात समोरच्या टेम्पोत एक गृहस्थ साखर झोप (साखरेच्या पोत्यवर झोप) घेताना पाहुन माणसाने वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शिकायला मिळाले. तेथुन वाट काढत खरेदी उरकुन वापस यायला निघालो आणि अभिमन्यु चक्रव्युहात फसावा तसे काही काळ गर्दीत फसलो. गल्ली बोळातुन शहराच्या बाहेर पडताच सुटकेचा निःश्वास टाकला आणि गावाकडे जाणाऱ्या झिगझॅग ( खाली वर व खड्डेदार) रस्त्याने परतीचा प्रवास सुरू केला....

टिप: वरील शब्द प्रपंच यासाठी की शहरातील कोरोना वाढु नये आणि गर्दी टाळावी अन्यथा असे कितीही लॉकडाऊन आपल्या शहराला संसर्गापासून वाचवु शकणार नाहीत.

लेखन आणि शब्दांकन :- ️©️Ganesh Ingole

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा