निसर्ग आपला सखा

निसर्गासारखा मित्र शोधुन सापडणार नाही. जसं मित्र सोबतीला असतील तर माणूस अगदी बिंदास असतो, आनंदी असतो कसली चिंता नसते ना कशाची फिकीर असते. जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे मित्रांचा सहवास असतो. त्यातल्या त्यात मित्रांसमवेत निसर्गाचे सान्निध्य लाभणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती घेण्यासारखे आहे. तो स्वर्गिय अनुभव आज आम्ही मित्रांनी घेतला.

जागतिक महामारी कोरोनामुळे बहुतेक अॉफिसनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आणि बऱ्याच दिवसानंतर विविध शहरांत कामानिमित्त विखुरलेले मित्र गावातील कट्ट्यावर जमले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग कुठेतरी बाहेर जाऊया असा प्लॅन ठरला. पण तो प्रत्यक्षात आणायला अनेक अठवडे खर्ची पडले. शेवटी काल ठरले की उद्या सकाळी जायचेच. मग ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठून फोन करायला सुरुवात झाली. त्यात दोन-तीन जणांनी टांग दिली आणि परत एकदा प्लॅन कॅन्सल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण इरादा पक्का होता म्हणुन "दो से भले चार" म्हणत अविनाश,मी आणि अलीम आम्ही तिघांनी गाड्या रस्त्यावर काढल्या पुढे जवळ्यात हरी केव्हाच आमची वाट बघत बसला होता. त्याला घेऊन  अखेर मार्गस्थ झालो.

हरीला घेतले आणि घाटसावळीच्या पुढे, देवळ्याकडे रात्रीच्या पावसाने भरलेले रस्त्याच्या खड्ड्यातील पाणी, टायरने उडवत आजुबाजुची नयनरम्य हिरवळ न्याहाळत निघालो. आपल्या गावापासून काही अंतरावर असे निसर्ग सौंदर्य असुन आपण त्याबद्दल इतके दिवस अनभिज्ञ का होतो हा प्रश्न मनात येऊन गेला. घाटातुन जाताना हिरवळीचा शालु पांघरलेले डोंगर, थंड हवेचे झोत, बाजुची झाडी, खोल दरी, पक्ष्यांचे मंजुळ स्वर, निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली विविध रंगांची उधळण कान आणि मण तृप्त करत होती. त्यातच वर्गमित्रांची सोबत आणखीनच रंगत वाढवत होती. पुढे उंचावर जाताच परिसरातील बरीच जलसाठे तळे, बंधारे, धरण, पाहुन एकेकाळी इथल्या बळीराजाच्या डोळ्यात असणारे पाणि या जमिनीवर पाहुण आनंद वाटला. मन प्रफुल्लीत झाले. कधीकाळी उघडी-बोडकी आणि विराण असणाऱ्या डोंगरांचे सुंदर आणि मोहक रूप डोळ्यात साठवून ट्रेकिंग साठी पुढे निघालो.

पुढे एका उंच डोंगरावर पहिल्यांदाच ट्रेकिंगचा अनुभव घेत निसर्गाचे विविध रूपं न्याहाळत डोळ्यात आणि कॅमेऱ्यात जमेल तसे कैद करत मनमुक्त फोटो सेशन केले. मित्रांच्या सहवासात आणि निसर्गाच्या सान्निध्यात दगडं,माती,चिखल तुडवत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. वेळ खुप झाल्याने सुर्याची कोवळी किरणं वेळेचे भान देत होती. तर पोटातील भुक घराचा रस्ता खुणावत होती. मात्र कडक गुळाचा चहा आणि घाटसावळीचा प्रसिद्ध गरमागरम टेस्टी लोकसेवा वडापावने ती कसर भरून काढली आणि पुढील रविवारी परत यायचा निश्चय करून अशा रीतीने सकाळ मार्गी लावुन आम्ही तब्बल 12 वाजता घर गाठले...

✍ गणेश इंगोले, पिंपळनेर
21/09/2020

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?