कुरूप बदकाचं पिल्लु?




परवाच दहावीचा निकाल जाहीर झाला.अनेकजण भरघोस टक्के मार्क घेऊन पास झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे! यात दुमत नाही मात्र याचवेळी कमी मार्क घेणारांना घरच्यांसह शेजाऱ्यांचे व पाहुण्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. या टोमण्यांमुळे मात्र या विद्यार्थ्यांची पुरती पंचायत होत आहे.टक्केवारी चांगली आहे पण त्याच्या किंवा तिच्या एवढी का नाही म्हणुन पालक मुला-मुलींना दुखावत असल्याने कित्येक विद्यार्थी स्वत:ला कोसताना पहावयास मिळत आहेत.मला या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे.ती गोष्ट आहे एका कुरूप बदकाच्या पिलाची.
            एका बदकाला चार पिल्लं होतात त्यातील तीन पिलं अगदी छान दिसत असतात, मात्र चौथे पिल्लु जरा कुरूप दिसत असते.ते कुरूप दिसत असल्यामुळे त्याची तीन्ही भावंड त्याला कुरूप म्हणुन चिडवत असतात. खेळायला जायचे असल्यास ते भावंड त्याला सोबत घेत नसत व त्याला दिसण्यावरून त्याला सतत चिडवत असत. त्यांचे पाहुन इतर प्राणी देखील त्या पिलाला चिडवायला लागतात. त्यांच्या त्या  चिडवण्यामुळे ते पिल्लु पुरतं खचुन जातं.
एके दिवशी ते पिल्लु दुर जंगलात निघुण जातं. जंगलातले झाडं,पाखरं,तळे व इतर प्राण्यांना पाहुन ते अगदी स्वत:चे कुरूप असणे विसरून जाऊन आनंदाने हरखुन जातं. त्या आनंदाच्या भरात ते दुरपर्यंत निघुण आलेलं त्याच्या लक्षात येत नाही. आता रात्र व्हायला लागलेली असते त्या पिलाला थंडी वाजायला लागते ते जोर-जोरात चालायला लागते.तितक्यात ते एका शेतकऱ्याच्या नजरेस पडते थंडीने कुडकुडणाऱ्या त्या बदकाच्या पिलाला पाहुन शेतकऱ्याला फार वाईट वाटतं. तो शेतकरी त्याला थंडीचे दिवसं संपेपर्यंत त्याच्या घरी घेऊन जातो.
जेव्हा त्या पिलाला बाहेर सोडण्याची वेळ येते तेव्हा ते खुप मोठे झालेले असते.म्हणुन शेतकरी त्याला एका छोट्याशा तळ्यात नेऊन सोडतो. तळ्यात सोडल्यानंतर ते पिल्लु स्वत:चे प्रतिबींब पाण्यात पाहते तर त्याचा त्यावर विश्वासच बसत नाही, कारण ते खुप सुंदर दिसायला लागलेलं असतं. ते पंख पसरून,मान हलवुन खात्री करते की ते प्रतिबींब त्याचेच आहे ना. ते पोहत-पोहत थोडं पुढे जातं त्याला त्याच्यासारखे अनेक पक्षी दिसतात. ते उंच आकाशात उडत असतात आणि पाहता-पाहता ते पिलुही उंच आकाशात भरारी घेतं आणि त्या राजहंसाच्या थव्यासोबत उडायला लागतं. हो ते राजहंसाच पिल्लु असतं! पण दुर्दैवाने ते बदकाच्या अंड्यासोबत मिसळलं गेलं असत आणि ते स्वत:ला बदक समजुन बसतं मात्र त्या शेतकऱ्यासोबत त्याची भेट होते आणि त्याचं आयुष्यच बदलुन जातं......
            आपल्या समस्या देखील त्या कुरूप बदकाच्या पिलासारख्याच आहेत.आपल्याला देखील त्याच्या प्रमाणे इतर अनेक जण आपल्या कमी पडलेल्या टक्केवारीवरून चिडवत आहेत आणि आपण देखील स्वत:ला कमी टक्केवारीवाले समजुन कोसत आहोत. त्या राजहंसाप्रमाणे आपल्याला देखील हे टोमने सहन करावे लागतील.काहीतरी वेगळ होण्यासाठी आपण जे करतोय ते सोडुन काहीतरी वेगळं करावं लागेलं कदाचीत त्यासाठी जरा जास्त कष्ट (अभ्यास) करावे लागतील.
त्याच बरोबर त्या बदाकाच्या पिलाप्रमाणे त्याला आवडणाऱ्या जंगलात म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी सकारात्मक संदेश आणि ऊर्जा देतात त्याच्या सानिध्यात जावे लागेल. जे आपल्याला कमी मार्कवाला म्हणुन हिनवतात त्यांच्या सानिध्यात आपण राहीलो तर आपण कायम स्वत:ला दोषी मानत राहुन त्यापेक्षा आपल्याला यातुन बाहेर निघण्यासाठी जो मदत करत असेल जो सकारात्मक ऊर्जा देत असेल अशा व्यक्ती-वातावरणाच्या सानिध्यात जाऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने अभ्यास करूयात कारण आपल्याला आणखी संधी आहेत. दहावी नंतर 12 वी आहे,सी.इ.टी.आहे अशा एक ना अनेक संधी आपली वाट पाहत आहेत. ज्यांचा वापर करून आपण सुध्दा राजहंस(गुणवंत) आहोत हे जगाला दाखवावं लागेल.चला तर मग मनाला आलेली हि मरगळ झटकुन पुन्हा नव्या जोमाने अभ्यस करून स्वत:चे भविष्य घडवुयात कारण नावं ठेवणं हे लोकांचं काम आहे तर त्यांनी ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवणे हे आपले कर्तव्य. तर मग आता घाबरायचं नाही आणि स्वत:ला दोष तर अजिबात द्यायचा नाही...
-: गणेश इंगोले (M.A. Mass Communication & Journalism)

Comments

Popular posts from this blog

निसर्ग आपला सखा