सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षण

आपल्या भारत देशात अनेक लैंगिक अपराध घडतात. काही उघडकीस येतात तर काहीजण बेआब्रु होईल म्हणुन प्रकरणं दाबले जातात. यांचं कारण शोधायला लागलो तर लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि त्याबाबतची उदासीनता या गोष्टींमुळे काही प्रमाणात आपण या गुन्ह्याना थांबवन्यात कमी पडत आहेत असे लक्षात येते. मध्यंतरीच्या काळात आपल्या शिक्षण विभागाने लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही मंडळींना असले शिक्षण आपल्या पाल्यांना दिले तर त्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल, म्हणुन यावर नाराजी व्यक्त केली आणि लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न विफल ठरला.
आपली भारतीय संस्कृती महान असुन कित्येक वर्षांपासूनची परंपरा आपल्याला लाभली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्र्चात्य देशांनी संशोधन करून त्यातील अनेक गोष्टी अंगीकारल्या आहेत मात्र आपण त्यांना आजही स्विकारत नाहीत त्यातीलच एक म्हणजे लैंगिकता. आपल्याकडे ३३ कोटी (प्रकारचे) देव आहेत. त्यात कामदेव आणि रती देवी हे लैंगिकतेचे देव आपल्याच पुराणातील आहेत तर कामसुत्र हा जगप्रसिद्ध ग्रंथ आपल्याच वात्सायन ऋषींनी लिहीलेला आहे. खजुराहोसह अन्य इतर जगप्रसिद्ध लेण्यांतील शिल्पकला पाहीतली तर आपला भारत देश पुर्वी लैंगिकतेच्या बाबतीत पुढारलेला होता असे लक्षात येते. मग आज आपण त्या बाबतीत एवढे संकुचीत विचार का करत आहेत. माणसाच्या जशा अन्न,वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत तशीच मानसीक आरोग्य राखण्यासाठी मैथुन ही देखील एक प्रमुख गरज आहे. मात्र सेक्स हा शब्द ऐकला की लोकं नाक मुरडायला लागतात. कारण आपले संस्कार आपल्याला त्या विषयावर मोकळेपणाने बोलायला आडवे येतात. नेमकी हीच गोष्ट आपल्याला या विषयापासुन दुर खेचते आणि अज्ञानाच्या दरीत झोकुन देते. 
जिथे प्रौढ व्यक्तींची अशी अवस्था आहे तिथे किशोर वयीन मुला मुलींचे तर विचारूच नका. आम्ही दहावीला असताना आमच्या विज्ञानाच्या शिक्षकाने "मानवी प्रजनन" या विषयावरील पाठ आम्हाला सर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटी वाचुन दाखवला होता. त्या तासात एका मुलीने एड्स म्हणजे काय? असा प्रश्न विचारला असता एक्वायर्ड इम्युनो डिफीसीएन्सी सिंड्रोम असा फुलफॉर्म सांगुन तीला खाली बसवले होते. वरील प्रसंग सांगण्याचा उद्देश हा की विज्ञानाचा शिक्षक सुध्दा लैंगिक विषयावर विस्तृतपणे योग्य माहीती देण्यास टाळतात. मग विद्यार्थ्यांना पर्याय उरतो तो फक्त इंटरनेट, मासीकं, साप्ताहिकं आणि पुस्तकं यातही अडचण अशी आहे वाचनाची आवड असणारा वर्ग अत्यंत कमी आहे. त्यामुळे इंटरनेट हे माध्यम बहुतांशजण जवळ करतात. इंटरनेट हे मायाजाल असल्यामुळे अनेकजण येथे येऊन भरकटतात आणि भलत्याच नादाला लागून वाहवत जातात आणि इतर समवयीन मित्र देखील त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे लैंगिकते बाबत चुकीची माहिती मिळवुन वाममार्गाला लागतात. अशा अवस्थेत या मुलांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. शिक्षक आणि पालकांनी या विद्यार्थ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागुन त्याच्या मनातील चुकीचे गैरसमज दूर करायला हवेत व योग्य मार्गदर्शन करावे.  गरज पडली तर एखाद्या डॉक्टरकडे जाऊन समुपदेशन करावे.
याच बरोबर अनेक स्वयंसेवी संस्था अशा मुला-मुलींसाठी अनेक सेमीनार आयोजित करत असतात त्याठिकाणी आपल्या पाल्यांना घेऊन जावे. तसेच अशा मुला-मुलींसाठी आपण एखादं मासीक सुरू करुन त्या मार्फत किशोर वयीन मुला-मुलींचे प्रश्न सोडवु शकतो आणि लेखमालेच्या माध्यमातुन योग्य मार्गदर्शन देखील करता येवु शकते. यासाठी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने अथवा शक्य झाल्यास त्यांनी स्वत: लिहीलेले लेख प्रकाशित करणे व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या उत्तराने शंकांचे निरसन केले जाऊ शकेल. सरकार आणि शिक्षण विभाग जोपर्यंत लैंगिक शिक्षणाबाबत गांभिर्याने विचार करत नाही तोपर्यंत काही प्रमाणात या समस्येंवरती वरील प्रमाणे तोडगा काढला जाऊ शकेल असे मला वाटते..

✍ Ganesh Ingole, Beed, (MA MCJ)
Cell:9561430671

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा